एखादी व्यक्ति ह्या दिवशी मुद्दाम आपल्याला विचारते "आज काय आहे?" आणि आपण पटकन बोलून जातो "आज पाडवा".. असे बोलून होते न होते तेच समोरून उत्तर येते "नीट बोल गाढवा".
आणि हे अगदी आपण सारेच एक विनोद म्हणून सहज बोलत असतो. एक विनोदाचा भाग सोडला तर...
सहज जरा विचार केला ह्यावर.. की असं का बरे बोलायला चालु केले असेल कोणी! इतका सुरेख सण हा आपल्या हिंदू धर्माताला.. आणि ह्या दिवशी असे का बोलत असावे. पाडव्याला गाढवा हाच का शब्द वापरला गेला.. ती rhyme पूर्ण करायला काही तरी चांगल्या शब्दाचाही उपयोग नाही का होउ शकत..?
खरं तर पाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षाचा दिवस.. हा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो..
हा सण म्हणजे नवीन आशा फुलावणारा, जे काही वाईट आहे त्याचे निरसन करणारा असा आहे. चैत्र पाडवा पासूनचे ९ दिवस हे चैत्र नवरात्र म्हणून साजरी करतात. ह्यालाच शुभंकरा नवरात्र असे ही म्हणतात. म्हणजेच शुभ गोष्टींची वृद्धी करणारी ही नवरात्र!! ह्या नवरात्रीत शुभाचे रक्षण व अशुभाचे बल क्षीण होत असते.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करतात. दरवाजासमोर रांगोळी काढतात. देवांची पूजा केली जाते. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. बांबूची काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवली जाते. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी केली जाते. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने वाहिली जातात.
ही गुढी उभारणे हेच मांगल्याचे प्रतिक! साखरेच्या पाकाच्या गाठी अन कडूनिंबाची पानं...म्हणजे आपल्या आयुष्यातले कडू- गोड प्रसंग. कुठलीही परिस्थिती असली तरी त्यात बांबूच्या काठीसारखं सरळ रहाणे हे आपल्याला शिकायला मिळते. सगळे काही मंगल सुरु करण्याचा हा दिवस!
म्हणूनच ह्या दिवशी "नीट बोल गाढवा" हे म्हणणयाऐवजी जसं आपण "तिळगुळ घ्या गोड गोड बोला" असं म्हणतो तसाच जर आपण "गुढी पाडवा"... " चांगले विचार घडवा" किंवा " नेहमी सर्वांना आनंदात बुडवा" असे काही नक्कीच म्हणू शकतो... नाही का ? :)
नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
~ केतकीवीरा कुलकर्णी
2 comments:
Simply nice Kk
केतकी खरोखरीच विचार करण्याजोगी बाब मांडली आहे. नवीन वर्षाच्या शुभ दिवशी आनंददायी, मंगल शुभ कामनांचा उच्चर करून सुविचारांची देवाण घेवाण व्हायला हवी हे पूर्णपणे पटले.
Post a Comment