सिरीयातील गृहयुद्धाने आज विश्वयुद्धाचे रुप घेतले आहे. आणि हे रुप दिवसेंदिवस अत्यंत भीषण होत चालले आहे. प्रत्येक देश आज दुसर्या देशाच्या विरोधात उभा आहे. आजचा मित्र उद्याचा शत्रु, किंबहुना आजचा मित्र तो पुढच्या क्षणाला शत्रु अशी परिस्थिती आज जगात निर्माण झालेली आहे. ह्याचे पडसाद कशा प्रकारे उठतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी!
ह्या विश्वयुद्धाची सुरुवात झाली तरी कशी? सिरीयामध्ये मूळात गृहयुद्ध पेटण्याचे कारण तरी काय?
अस्सद राजवट ही जवळपास १९७१ पासून सिरीया मध्ये चालत आली आहे. हफीज-अल-अस्साद ह्यांच्या नंतर २००० साला पासून त्यांचा मुलगा बशर-अल-अस्साद राष्ट्रध्यक्षपदी नियुक्त झाला. बशर अस्साद ह्यांच्या सत्तेमध्ये सुरुवातीला बेरोजगारी, भ्रष्टाचार सारख्या गोष्टी तेथील जनतेला भेडसावू लागल्या. तसेच बशर ह्यांचे राज्य येताच त्यांनी सिरीया आणि हिजबुल्लाह मध्ये संबंध स्थापित करण्यास सुरुवात केली. ह्याशिवाय तिथे शिआ व सुन्नी असे दोन मुस्लिम गट झाले व दोन्ही गटांचे एकमेकांविरोधी भूमिका बनत गेली. आणि त्याबरोबरीनेच अस्साद राजवटीच्या बाजूने व अस्साद राजवटीच्या विरोधात असेही दोन वेगळे गट तयार झाले.
मार्च २०११ पासून सिरीया मधल्या घडामोडींनी युद्धाच्या दिशेने वळण घेतलं. अरब स्प्रिंग नावाच्या लाटेमध्ये सिरीयाचा सुद्धा सहभाग होता. अरब स्प्रिंग म्हणजे अरब क्रांती ज्यामध्ये हिंसक अहिंसक मोर्चे, निषेध, दंगली, आकस्मिक हल्ले, आंतर्राष्ट्रीय हस्तक्षेप, गृहयुद्ध ह्या गोष्टींचा समावेश असतो. दारा मधील काही तरुणांनी अस्साद विरोधी निदर्शने केली ज्यामुळे त्या तरुणांना अटक करण्यात आली. आणि ह्याचा निषेध म्हणून हजारोंच्या संख्येने निदर्शक जमा झाले. हळूहळू बशर अस्साद ह्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली ज्यातून सिरीयामध्ये गृहयुद्धाने पेट घेतला. आणि २०११ पासून सुरु झालेले हे गृहयुद्ध आता विश्वयुद्धाच्या रुपात येऊन अधिकच भीषण होत चालले आहे.
सिरीयातील ह्या अंतर्युद्धामध्ये इतर देश कसे उतरू लागले?
बशर अस्सादचा ह्यामुळे तेथील प्रभुत्व कमी होत गेले आणि हळूहळू इतर देशसुद्धा ह्यामध्ये सहभागी होऊ लागले. रशिया, इराण हे अस्सादच्या बाजूने आहेत तर अमेरिका, तुर्की सौदी, फ्रांस हे देश असादच्या विरोधात उभे आहे.
इराण अस्साद राजवटीच्या पाठींबा देणार्यामधील एक. सिरीयातील गृहयुद्ध सुरु होण्यापूर्वीच इराणने संरक्षण करार केला होता. तसेच इराण पैसा, शस्त्र सारख्या गोष्टी अस्सादला पुरवत आला आहे. ह्याबरोबरच इराणने आपले लष्करी तळसुद्धा सिरीयामध्ये बसवले आहे ज्यामुळे इस्रायलला एक मोठा धोका नेहमीच निर्माण होत आला आहे.
इस्रायलने हिजबुल्लाह संघटनेच्या विरोधात हल्ले चढवले आहेत तसेच इराणला लष्करी तळ तिथे ठोकण्यापासून परावृत्त करण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरु आहेत. इराणला आपले लषकरी तळ सिरीयामध्ये उभारू देणार नाही अशी धमकी इस्रायलने इराणला दिली आहे.
तेच इराणने देखिल इस्रायलविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. इराणने सुद्धा काहीही झाले तरी आपले तळ तिथून हलवणार नाही अशी इस्रायलला धमकी दिली आहे. अस्साद राजवटने मात्र इराणला लषकरी तळ उभारण्यास पूर्ण पाठिंबा दिला आहे.
रशियाचा पाठिंबा एका बाजूने अस्साद राजवटीला आहे पण आता मात्र इराणला लष्करी तळ सिरीया मध्ये बसवू न देण्यासाठी रशिया इस्रायलला पाठिंबा देत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
सौदी अरेबिया मध्ये प्रामुख्याने सुन्नी मुस्लिम आहेत आणि इराणचा मध्य पूर्व क्षेत्रामध्ये वाढत असलेला प्रभाव कमी करण्यासाठी आणि अस्साद ऐवजी इराणच्या विरोधातील राष्ट्रध्यक्ष म्हणून नेमण्यासाठी सौदी इराण व अस्सादच्या विरोधात उभा आहे.
आणि अशा पद्धतीने जवळपास सर्वच देश सिरीयाच्या संघर्षामध्ये ओढले गेले आणि आता सिरीयामध्ये प्रामुख्याने इराण विरोधी इस्रायल, रशिया, सौदी, अमेरिका तर इराणच्या बाजूने तुर्की असे काहीसे स्वरुप दिसत आहे. इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश तर एकमेकांना संपवण्याची धमकी देत आहेत.
हे गृहयुद्ध एका विश्वयुद्धामध्ये परिवर्तित झाले असतांना दुसर्या बाजूला व्यापारयुद्ध जोर घेत आहे. अमेरिकेने इराण सोबतच्या अणुकरारामधुन माघार घेतली. त्याचबरोबर जे देश इराण सोबत इंधन व्यापार करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे देखिल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी स्पष्ट केले आहे. फ्रांस, जर्मनी अमेरिका व चीनमध्ये तर व्यापारयुद्धाची ठिणगी तीव्रतेने पेट घेत आहे. अमेरिकेने चीन बरोबर व्यापारयुद्धाच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलणार नाही असे सांगितले असतांनाच ट्रम्प ह्यांनी चीनवर कर लादले. चीनमधून आयात केल्या जाणार्या सुमारे ५० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर अमेरिकेने २५ टक्के कर लादला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ६०० हून अधिक उत्पादनांच्या आयातीवर कर वाढविण्याचे जाहीर केले. ज्यामुळे चीन व अमेरिकेमध्ये जाहीररित्या व्यापारयुद्ध सुरु झाले आहे.
त्याचवेळी चीनचे साऊथ चायना सी वर प्रभुत्व गाजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत ज्याला ऑस्ट्रेलिया, अमेरिका, व्हिएतनाम, असे सर्वच देश खोडू पाहत आहेत. अमेरिका व तैवानची वाढती जवळीक चीनला त्रासदायक ठरत आहे. साऊथ चायना सी मध्ये चीनने कृत्रिम बेटं तयार करुन ठेवली आहेत व ते उडवण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचा इशारा अमेरिकन संरक्षणदलाच्या संचालकांनी चीनला दिला. तसेच मलेशियामध्ये आलेल्या नविन पंतप्रधानांनीसुद्धा चीनला शह दिला आहे. चीनची जागा जापान घेऊ शकतो असा इशारा मलेशियाच्या पंतप्रधानांनी दिला आहे. अजूनतरी ह्याबाबतीत चीनची काहीच हालचाल दिसत नसली तरी चीन नक्कीच स्वस्थ बसणार नाही.
हे सर्व चालू असतांनाच प्रत्येक देश हा प्रत्येक स्तरावर युद्ध खेळू पाहत आहेत. सायबर हल्ले घडवून शत्रु देशाची गुप्त माहिती चोरणे, किंवा त्या माहिती मध्ये फेरफार करण्यात येतो किंवा ती माहिती पूर्णपणे नष्टदेखील केली जाऊ शकते.
बायोलॉजिकल वॉरफेयर, ज्यामध्ये अशा प्रकारच्या जीवणूचा उपयोग केला जातो ज्यामुळे भयानक असे संसर्गजन्य रोग उत्पन्न होऊन त्याचा परिणाम हा बहुतांश टक्के मृत्युच असतो.
एखाद्याचे मनोबल पूर्ण तोडून त्याचे खच्चिकरण करुन मग त्यावर हल्ला करायचा हेदेखिल एक प्रकारचे युद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जात आहे ज्याला सायकोलॉजिकल वॉरफेयर म्हटले जाते.
एवढेच नाही तर आवाजाचासुद्धा पुरेपुर उपयोग करून युद्ध खेळले जात आहे. सुपरसॉनिक हल्ले म्हणून ह्यांचा उल्लेख केला जातो. नुकतेच चीनमधील अमेरिकी अधिकाऱ्यांवर हे हल्ले केले गेले ज्यामुळे त्यांना brain injury झाल्याचे निदर्शनास आले.
आणि सध्या सर्वात जास्त जोर घेत आहेत ते म्हणजे आर्टिफिशयल इंटेलिजेंस. ह्याचा जर चांगला उपयोग केला गेला तर नक्कीच त्याचे फायदे आहेत पण युद्ध म्हणून जर ह्यांचा उपयोग झाला किंवा रोबोसना सुद्धा नागरिकत्व बहाल केले गेले तर मानवी अस्तित्वावरच एक प्रश्नचिन्ह उभा राहण्याची दाट शक्यता आहे. मध्यांतरी सोफिया नावाच्या एका रोबोचा इंटरवह्यू घेण्यात आला ज्यामध्ये तिने हेच स्पष्ट केले होते.
अशा प्रकारे बघतिलं तर सर्व स्तरावर युद्ध खेळले जात आहे. अशी एकही गोष्ट नाही ज्यापासुन युद्ध होउ शकत नाही. आणि असे अनेक प्रकारचे युद्ध खेळले जात असतानाच survival of the fittest ह्या तत्वाने आपल्या प्रत्येकालाच तयार राहणे आवश्यक आहे कारण हे तिसरे विश्वयुद्ध घराघरामध्ये पोहोचणारे आहे.
- केतकी कुलकर्णी
- केतकी कुलकर्णी
3 comments:
अतिशय सुरेख व सविस्तर विश्लेषण
Very important information
👌👌👌👌
Post a Comment