Friday, 9 January 2015

प्रवास.....

ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म वर आले. भरपूर गर्दी होती.. ट्रेन ची वाट बघत सगळे उभे होते... एकदाचि ट्रेन आली आणि सगळ्यांची जी ट्रेनमधे चढण्यासाठी ओढाताण सुरु झाली की काही बघायलाच नको.. कसेतरी धक्काबुक्की करत, ट्रेन मधे घुसले.. तर पुन्हा आतमधे पण गाडी भरलेलीच की! कस तरी वाट काढत काढत आत जायचा प्रयास केला आणि उभ राहण्यासाठी एक कोपरा पकडला.. हुश्श्! सुटकेचा श्वास सोडला..पण खरच अगदी भर गर्दीच्या वेळेत ट्रेन मधून प्रवास करण म्हणजे खर तर एक अत्यंत दिव्य काम आहे!!

आपल्या आयुष्यसुद्धा असेच असते नाही का? 

माझे करियर, माझ लग्न, माझा संसार, माझा पैसा,  माझी प्रतिष्ठा, मला मिळालेली लौकिकता ह्या सगळ्यात माझी ओढाताणच सुरु असते ना! ज्याप्रमाणे ट्रेन मधल्या गर्दीमुळे मी ना मोकळा श्वास घेऊ शकत ना बाहेरचे सौंदर्य अनुभवु शकत, अगदी तसच ह्या आयुष्यातील सो कॉल्ड अचिव्हमेंटच्या गर्दीमधे अडकून ना मी कधी शांत जगु शकत आणि माझ्या आजुबाजूच्या गोष्टींमधे आनंद नाही घेऊ शकत. जसे आपण एकमेकांना ढकलत ढकलत आत शिरतो तसेच आयुष्यात इतरांचे पाय खेचत स्वतः पुढे जाण्याचे मार्ग बघत असतो. ट्रेन मधे शिरल्यावर ही आत परत आपल्या पुढे गर्दी असतेच तसेच पुढे गेल्यावर परत माझ्या पुढे कोण ना कोण असतच.. म्हणजे इथे चालु होते ती स्पर्धा आणि त्यातून पुन्हा ओढाताण!!

पण आता आपला ट्रेन चा प्रवास सुखाचा कधी होत असतो तर ज्या वेळी मी सगळे लोक जात आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला जातो तेव्हा.. त्यावेळी गाडी रिकामी असते, आरामात शांतपणे प्रवास होतो.. हो ना?

आयुष्याच्या प्रवास देखील उलटा होणे आवश्यक आहे. आपल्याला आयुष्यात काय हव असत? तर सुख....पण आपले सुख म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, किर्ती यातच अडकलेले असते आणि या वरकरणी सुखाच्या वाटणार्‍या गोष्टींतून प्राप्त होते ती अशांती आणि असमाधान. मुळात सुखी असणे म्हणजे आयुष्यात शांतता आणि समाधान असणे असे मला वाटते. सुखाचे दूत म्हणजे शांतता आणि समाधान. पण आपल्या वायफळ प्रयत्नात आपल्या वाट्याशी येतात ते दुःखाचे दूत अशांती व असमाधान. आणि म्हणून आपल्या आयुष्याचा प्रवास उलट होणे आवश्यक असते. शांती आणि समाधान पुढील "अ" काढावयाचा असल्यास अंतर्मूख होणे अर्थात परमेश्वराला सन्मूख होणे आवश्यक असते.
आणि एकदा का सन्मूख झालो की शांती समाधानाच्या मार्फत येते ते चिरकाल टीकणारे सुख आणि आयुष्याच्या न टाळता येणार्‍या धावपळीतही घेता येतो तो मोकळा श्वास! 
मग अशा वेळी कसली स्पर्धा नसते किंवा कसली ओढाताण ही नसते. असतो तो सतत पुढे जाणारा, नेणारा प्रवास....प्रगतीचा...उत्साहाचा....उद्धाराचा...

- केतकीवीरा कुलकर्णी

0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *