आपण सर्वच जण ह्या शब्दाशी जोडले गेलेलो आहोत. विचार करणे ही एक आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य गोष्ट बनलेली आहे. आपल्या आयुष्यात श्वासोच्छ्वासाचे जे महत्त्व आहे तेवढेच महत्व मला वाटते विचार ह्या गोष्टीला आहे. फरक इतकाच की माझी श्वास घेण्याची क्रिया माझ्या जन्माच्या आधिपासूनच म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासूनच चालू होते व विचार करण्याची क्रिया मी जन्माला आल्यानंतर चालु होते. अगदी लहान बाळ सुद्धा विचार करतच असत.. आपण बघतो ना की कधी कधी मधेच बाळ खुदकन हसतं, मधेच रडतं.. कोणाकडे जातं खेळायला तर कोणाकडे पाठ फिरवतं.. तेव्हा त्याच्या ही मनात, डोक्यात विचार चालूच असतील ना! फक्त त्याला हे समजत नसते की आपण विचार करत आहोत.. इतकेच!
आणि जस आपल्याला ऑक्सीजन मिळण्याचे थांबल्यावर आपले हृदय बंद पडते, अगदी तसेच जेव्हा माणूस विचार करायच थांबवतो तेव्हा त्याचा मेंदू बंद पडतो.. म्हणजेच आपण कधी कधी म्हणतो ना, मेंदूला गंज चढला आहे, ह्याचाच अर्थ असा की बुद्धिला चालना न मिळाल्यामुळे ती पाहिजे तस काम करत नाही आहे.
असेच इंटरनेट वर ब्राऊस करता करता एक वाक्य मला दिसले...
'चर’ म्हणजे चालणे, वि+चर म्हणजे विशिष्ट तर्हेने चालणे. ‘चर’ चे ‘चार’ हे प्रयोजक रूप आहे. चार म्हणजे चालविणे. बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार ‘चालविणे’ म्हणजे विचार करणे.
ह्याचाच अर्थ माझ्या बुद्धिला किंवा मनाला जी चालना मिळते ती ह्या विचारातूनच. प्रत्येक गोष्टीत आपण विचार करतोच.. अविचारी माणूस दिशाहीन होतो. त्याला स्वतःला स्वतःचे असे काही उरतच नाही, कारण त्याची बुद्धि स्वतः विचार न केल्यामुळे इतरांच्या म्हणण्याप्रमाणे चालु लागते.
विचार केल्याने माझी कल्पनाशक्ति, निरिक्षणशक्ति व निर्णयशक्ति विकसीत होऊ लागते. पण मग आता हे विचार उचित दिशेने झाले तरच ते फायद्याचे ठरतात. कारण तस बघायला गेल तर पशुसुद्धा विचार करतातच.. त्याचे शिकार त्याला मिळावे ह्यासाठी तो विचार करुनच त्यावर झड़प घालत असेल ना आणि तेच समोरचा शिकार होणारा प्राणीसुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी विचार करतच असेल ना? म्हणजेच प्राणीसुद्धा विचार करतात. मग मनुष्य आणि प्राणी ह्यामधे काय फरक आहे? खूप मोठ्ठा फरक आहे, तो म्हणजे मनुष्याला दिलेली बुद्धि.. ह्या बुद्धीच्या सहाय्यानेच तो योग्य विचार करू शकतो. त्याचबरोबर मनुष्याला मिळालेले असते ते कर्मस्वातंत्रय! आणि ह्या कर्मस्वातंत्रयाचा योग्य वापर व्हायला हवा जेणेकरून आयुष्यातल्या कटकटी कमी होण्यास मदत होईल. आणि ह्या कर्मस्वातंत्र्याचा उपयोग योग्य कधी होईल, तर जेव्हा आपले विचार योग्य असतील. जेव्हा हे विचार चांगले असतील, योग्य असतील तेव्हाच माझी कल्पनाशक्ति, निरीक्षणशक्ति व निर्णयशक्ति हे नीट पद्धतीने विकसीत होऊ शकतात. आणि मग उचित क्रिया माझ्या आयुष्यात घडू शकतात.
एक प्रश्न आपण लहानपणापासून ऐकतो आहोत..
सुखी माणसाचा सदरा कोणता?
मला वाटते याचे उत्तर म्हणजे "आपले उचित विचार"
आपण जर विचारच उचित दिशेने करु लागलो तर आयुष्यात येणारे दुःख हे मुळी दुःखच उरणार नाही आणि सुखाची अवस्था असणे म्हणजेच दुःख नसणे असे मला वाटते. सुखाची व्याख्याच आपल्याला अशी करता येऊ शकते की दुःखाचा जेथे अभाव आहे ते सुख....आपण नेहमी सुख मिळविण्याचे मागे लागतो. त्यापेक्षा जस अंधाराचे रुपांतर प्रकाशात होते तसे दुःखाचे रुपांतर सुखात केले तर...?
हे रुपांतरण होणे आवश्यक आहे व ते उचित विचारानेच होऊ शकते...
आत्ता तुम्ही विचाराल की एखाद्या व्यक्तीची अत्यंत जवळची व्यक्ती देवाघरी गेली...ही नक्कीच दुःखद गोष्ट आहे. मग या दुःखाचे रुपांतर सुखात कसे होऊ शकते? नक्कीच होऊ शकते. कारण दुःख करुन ती व्यक्ती परत तर येणार नाही. मग त्या जाणार्या व्यक्तीला देवाची आज्ञा समजून त्या व्यक्तीच्या गोड आठवणी जपून त्या आठवणींच्या सुखात नक्कीच राहू शकतो आणि हे उचित विचारानेच शक्य आहे. रणांगणावर धारातीर्थ पडणार्या सैनिकांच्या आप्तांना देखील अतोनात दुःख असते...पण तरिही माझा मुलगा किंवा नवरा हा देशासाठी शहिद झाला ह्या अतुलनीय पराक्रमाची जाणीव नक्कीच सुखाहून जाते. शेवटी आपण विचार काय आणि कसा करतो यावरच सर्व अवलंबून असते.....
परमेश्वरी तत्त्वाचे अधीष्ठान विचारांना असले की ते विचारांना विवेकाची जोड मिळते आणि ते उचित दिशेने प्रवाहित होतात . आणि विवेक बुद्धी जागृत करण्याची शक्ती देत असतो तो एकमेव बुद्धीस्फुरणदाता भगवंत...दुसरे कुणीही नाही...
- केतकीवीरा कुलकर्णी
1 comments:
Nice chain of thoughts and well put! And here lies the key to success.
Ambadnya
Sandeep Mahajan
Post a Comment