Saturday, 2 May 2015

आजार मोठा उपाय नॅनो







आमच्या ओळखीतील एक आजोबा कॅन्सरची ट्रिटमेंट घेत असताना वारले. त्यांना कधीही व्यसन नव्हते. त्यांचे खाणे पिणे व्यवस्थीत होते. उभ्या आयुष्यात कधी कोणता मोठा आजार झाला नाही आणि उतारवयात लक्षात आले ते थेट कॅन्सर....लास्ट स्टेज..सारेच हळहळले. पण आता जाण्याचेच वय त्यात काय खंत करायची असे म्हणत त्यांनी ही धीराने घेतले आणि घरातल्या सगळ्यांना धीर दिला म्हणून सगळे या दुःखातून लवकर सावरले. परंतु त्यानंतर काही दिवसातच ४०-४५ वय असलेल्या एका मैत्रीणीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि आधीपेक्षा जास्त सुन्न व्हायला झाले....४०-४५ हे काय वय आहे जाण्याचे....त्यानंतर अगदी विशीतल्या मुलाला देखील कॅन्सर झाल्याचे कानावर आले. एका पाठॊपाठ एक घटना समोर आल्यावर विचारचक्र आपोआप सुरु झाले की अचानक हा कॅन्सर सारखा आजार बळावला कसा? याने माझे डोके ठणकू लागले.



जर एखाद्याला कुठले व्यसन नाही आहे..तरी त्याला कॅन्सर होऊ शकतो? तर हो... कारण आपण काय खातोय हेच आपल्याला ठाऊक नसते. आता साधी गोष्ट, आपण इंटरनेटवर, वॉटसअपवर अनेकदा मॅसेज वाचतो की कृत्रिम रित्या पिकवलेल्या केळ्यांमुळे कॅन्सर होऊ शकतो. कृत्रिमरित्या पिकवल्या जाणार्‍य़ा आंब्यांमुळे कॅन्सर होऊ शकतो. गाडीवरचे चायनीस पदार्थ सतत खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो. हिरव्या गार वाटणार्‍य़ा भाज्या ज्या हिरव्या गार दिसण्यासाठी रंग मारलेला असतो त्यामुळेही कॅन्सर होऊ शकतो...म्हणजे पहा की सध्या जगात भेसळच इतकी आहे की आजारी पडण्यासाठी कोणत्याही व्यसन असण्याची आवश्यकताच नाही मुळी.

त्यामुळे आपण काय खातोय...सेंद्रिय पद्धत्तीने पिकवलेले भाज्या, फळे खातो आहे का? याकडेही विशेष लक्ष पुरविले पाहीजे. पण हे सगळ करण्यात आपण कितीसे पुरे पडणार म्हणून मग जे आहे ते तसे स्वीकारत पुढे जातो आणि कॅन्सर सारख्य़ा आजाराचे आयते गिर्‍हाईक होतो. म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे.
याच बरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वापरातील प्लॅस्टीक. या प्लॅस्टीकमध्ये असणार्‍या बी पी ए नामक घटकाने हमखास कॅन्सर होतो. जेव्हा प्लॅस्टीक उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा हा घटक मोकळा होऊ लागतो आणि त्या प्लॅस्टीकमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थात मिसळतो आणि आपल्या पोटात जातो. उष्णतेच्या संपर्कात नाही आला तरी सततच्या वापराने तो आपल्या पोटात जातोच. आता विचार करा आपण किती प्लॅस्टीक वापरतो....प्लॅस्टीकची प्लेट, ग्लास, चहाच कप, आंघोळीची बाल्दी, मग, पाण्याची बाटली, डबे इत्यादी. म्हणजे कॅन्सरला आमंत्रणच. ह्या सगळ्या गोष्टी बदलून पुन्हा जुन्या स्टीलच्या गोष्टींकडे आपण वळलेच पाहिजे.

कॅन्सरला अट्काव करतील असे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आले पाहिजे त्यातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कडीपत्ता. कडीपत्त्याचे सेवन सातत्याने केल्याने अनेक प्रकारचे कॅन्सर आपल्यापासून दूर राहू शकतात त्यामुळे दिवसाला किमान पाच पाने तरी पोटात जाणॆ आवश्यक आहे. तसे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वृद्धी देखिल होणे आवश्यक आहे. तर अधिक माहिती वेळोवेळी तुम्हाला इथे मिळत राहील. http://www.aarogyamsukhsampada.com/

प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. पण सर्व काळाजी घेतली आणि तरी देखील हा आजार झाला. तर मग काय? अतीशय वेदनादायक अशी केमोथेरपी. ह्या केमोथेरपीमधून जाणे म्हणजे अक्षरशः अग्नीदिव्य. पण ही केमोथेरेपी सुसह्य आणि कॅन्सरचे वेळेत निदान होण्यासाठी अतीशय फायदेशीर ठरु शकते ती नॅनो टेक्नॉलॉजी.

शरिरात हळू हळू पसरत जाणार्‍या आणि शरिर पोखरणार्‍य़ा कॅन्सरच्या या मोठ्या व्याधीवर अतिशय परिणाम कारक ठरु शकणारे हे नवीन युगाचे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा फायदा सर्वाधीक वैद्यकिय क्षेत्रातच करता येणार आहे आणि तो काय कसा होईल याची आपण कल्पना देखील करु शकणार नाही. आपण या कल्पना नक्कीच पाहणार आहोत. पण आधी कॅन्सरवर कसे हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल हे पाहूया.

आपल्या अनेक रोग होतात ते जिवाणू (bacteria) आणि विषाणूंमुळे (viruses). त्यांच्या पासून बचावासाठी ऍण्टीबायोटिक्सचा शोध लागला. पण जीवाणू आणि विषाणूना ऍण्टीबायोटीक्सची सवय झाली की मग त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. मग पुन्हा नवे ऍण्टीबायोटीक घ्यावे लागते आणि हे सत्र असच सुरु राहते. यावर नॅनो टेक्नोलॉजी परिणाम कारक ठरु शकते. वेगवेगळ्या नॅनो कणांमुळे या ऍण्टीबायोटिक्सना जबरदस्त पर्याय मिळाला आहे. त्यामूळे शरिराच्या आजाराचे युद्ध आपण जिंकू शकतो असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम नॅनो कण करु शकतात त्यामुळे कोणत्याही ऍण्टीबायोटीक्सची गरजच भासणार नाही.

हल्ली औषधांच्या दुनियेत एक शब्द फारच प्रचलित आहे "बायोअव्हेलिबिलिटी" म्हणजे शरिरात घेतलेलं एखाद औषध किती प्रमाणात फक्त आजारी पेशींपर्यंतच जाऊ शकतं याचं प्रमाण! पूर्वी औषधांची बायोअव्हेलिबिलिटी फारच कमी असायची. म्हणजेच घेतलेल्या औषधाचा फार कमी हिस्सा आजारी पेशींपर्यंत पोहोचायचा.  मात्र हळू हळू ही बायोअव्हेलिबिलिटी वाढविण्यात यश येत आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजीमुळे नेमक्या आजारीच पेशीवरच उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आधी जेव्हा एखाद्या आजारासाठी एक बॉटल औषध घ्यायची गरज असेल तिथे एका चमच्यात काम झालेले असेल.
कॅन्सरच्या उपचारांमध्ये याचा फायदा सर्वाधिक होईल.

आपल्या शरिरात जुन्या पेशी मृत होतात व त्यांची जागा नवीन पेशी घेत राहतात. पण कधी कधी या प्रक्रियेत खंड पडतो आणि जुन्या पेशी जिवंत राहतात आणि नविन पेशी जन्म घेत राहतात. काही विशिष्ट पेशींची होणारी भारंभार वाढ हे कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण आहे. या कॅन्सरग्रस्त पेशी नष्ट होत नाही. त्या साठत राहून त्याची गाठ तयार होते. ही गाठ कापून काढावी लागते. तसेच ह्या पेशी पुन्हा होऊ नये म्हणून केमोथेरेपी सारखी अतिशय त्रासदायक ट्रिटमेंट घ्यावी लागते. सध्या या केमोथेरपीमुळे कॅन्सरग्रस्त पेशी बरोबर चांगल्या पेशी देखील नष्ट होतात. हा या थेरेपीचा सगळ्यात मोठा दोष आहे.

पण भविष्यात केमोथेरपी मध्ये कार्बनचा रेणू असणार्‍य़ा असा बहुगुणी फुलरीन रेणू वापरला जाईल. ह्या फुलरिन रेणूला निरोगी पेशी आणि कॅन्सरग्रस्त पेशी यामधील फरक ओळखता येतो. या फुलरिनच्या पोकळीत आवश्यक ते औषध भरुन नंतर ते जर शरिरात सोडलं तर ते औषध फक्त कॅन्सरग्रस्त पेशी पर्यंतच पोहोचू शकते. 


नॅनोस्पेक्ट्रा बायोसायन्स या कंपनीने एक प्रयोग उंदरांवर केला होता. हा प्रयोग माणसांवर यशस्वी झाल्यावर केमोथेरपी अगदी बिनधोक्याची होऊन रुग्णाचा जबरदस्त फायदा होईल. या प्रयोगामध्ये एका अतिसूक्ष्म सोन्याचा मुलामा दिलेली काचेची गोळी शरिरात सोड्ण्यात येते. या गोळीवर शरिरातील ऍण्टीबॉडीजच लेप दिलेला असतो. या ऍण्टीबॉडीजना शरिरातील नको असलेल्या गोष्टींना ओळखण्याचे काम असते. याचा लेप दिलेल्या गोळ्या शरिरात सोडल्या की ऍण्टीबॉडीजच्या सहाय्याने या कॅन्सरग्रस्त पेशीना चिटकून बसतात. मग शरिरावरुन लेझर फिरवला जाईल. ह्या गोळ्या हा लेझर प्रकाश शोषून घेतील आणि त्या उष्णातेमुळे कॅन्सरपेशी मरुन जातील. अशी कल्पना आहे. ह्या गोळ्या प्रकाश परावर्तीत देखील करतात त्यामुळे हा प्रकाश कॅमेर्‍यात पकडून नेमक्या त्याच जागेवर इलाज करणे डॉक्टरांना शक्य होईल.  स्तनांच्या कॅन्सरवर ही पद्धत जास्त फायदेशीर ठरेल. 
केवळ कॅन्सरपेशींना टारगेट करण्याचे तंत्र आज हे काही प्रकारच्या केवळ रक्ताच्या कॅन्सरमध्येच शक्य झाले आहे. हळू हळू सर्व प्रकारच्या कॅन्सरचा इलाज हा "टारगेटेड ड्रग डिलिव्हरी"मुळे करता येईल आणि कॅन्सरची ट्रिटमेंट ही आशादायी होईल. नॅनो तंत्रज्ञानामुळे नॅनो पेशींचा अभ्यास करणे सोप्पे झाले आहे आणि त्यामुळे अनियंत्रित अनिर्बंध अशा कॅन्सरग्रस्त पेशी नष्ट करण्यास नवनवीन पद्धती शोधण्यास वेग आलेला आहे. 

हे झाले केवळ कॅन्सरच्या संदर्भात इतर अनेक बाबतीत हे तंत्रज्ञान कसे फायदेशीर ठरु शकते आणि त्याच्या वैद्यकिय क्षेत्रातील अचाट कल्पना आपण पाहू पुढील भागात.


- संदर्भ
- नॅनोदय - अच्युत गोड्बोले व माधवी ठाकुरदास
- डॉ.अनिरुद्ध धै जोशी (सेल्फ हेल्थ सेमिनार)
http://www.aarogyamsukhsampada.com/


- केतकी कुलकर्णी 

1 comments:

Unknown said...

नॅनो टेक्नॉलॉजीमुळे बायोअव्हेलिबिलिटी वाढविण्यात यश येत आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजीमुळे नेमक्या आजारीच पेशीवरच उपचार करणे शक्य होणार आहे.ही खूपच आशादायी गोष्ट आहे. केतकी पुढील लेखाची वाट पहात आहे...

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *